पैठण प्रतिनिधी
कु.वैष्णवी बनकर
छत्रपती संभाजीनगर : ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया रहाटगाव व सोलनापूर येथे अपूर्ण आहे. या ठिकाणी मोजणी, कृषी मूल्यांकन प्राप्त करणे, पुनर्मूल्यांकन करणे आदी कामांबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना मोबदला प्रदान करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी (ता. ३१) जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची सद्यःस्थिती आदी विषयांचा समावेश होता.
या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्य अभियंता गवळी, कार्यकारी अभियंता येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मिरासे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशोक शिरसे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पांडुरंग वाबळे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे प्रमोद सुरसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. प्रकाश मुंडे आदी उपस्थित होते.
सुखना प्रकल्प व संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात यावा. सुखना प्रकल्पा संदर्भात पुनर्वसन प्रस्ताव पाठवावा. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून प्राप्त निधीतून कामे पूर्ण करून उद्यानाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देश श्री. भुमरे यांनी दिले.