पैठण प्रतिनिधी:
कु.वैष्णवी बनकर
विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत झाला असून याचा फायदा पैठण मतदार संघात होणार आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.पैठण येथे सोमवारी (ता. ३१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी युवा नेते दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, शहराध्यक्ष जितू परदेशी, युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, विजय चव्हाण, प्रा.पांडुरंग थोटे, रावसाहेब आडसूळ, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, सुरेश दुबाले, आबासाहेब मोरे, भाऊसाहेब पिसे, अप्पासाहेब गायकवाड, नीता परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष कैलास पाटील पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंबीर नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला आहे. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेची व विकासाची कामे करून घ्यावी.
पराभवाचा बदला घेणार: दत्ता गोर्डे
यावेळी श्री दत्ता गोर्डे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे पैठण मतदार संघातील मागील विधानसभा सभा निवडणुकीत निसटत्या झालेल्या पराभवाचा बदला घेणार आहे. तत्पूर्वी नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, संत एकनाथ साखर कारखाना या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे गोर्डे यांनी जाहीर केले आहे.
अजित पवार यांच्यामुळे विकास: निर्मळ
तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जायकवाडी धरणातून करण्यात आलेली कोट्यवधींची ब्रम्हगव्हाण सिंचन योजना मार्गी लावली आहे. पैठण मतदार संघाच्या विकासासाठी अर्थमंत्री म्हणून भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे आज विकास दिसत आहे. या विकासाच्या जोरावरच विधानसभा जिंकायची असल्याचे ते म्हणाले.