नारायणगाव: येथील पुणे-नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅन व इतर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमो व्हॅनच्या चालकासह नऊ जणांचा मृत्यू झाला असून सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
या पैकी सहा जणांवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात तर एका गंभीर जखमीला पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला, चार पुरुष व एक लहान मुलगा आहे. अपघात शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता झाला. आशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रवाशी
देबुबाई दामू टाकळकर (वय 65, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), विनोद केरूभाऊ रोकडे (50,वाहन चालक राहणार कांदळी,ता. जुन्नर जि.पुणे), युवराज महादेव वाव्हळ( वय 23, रा. 14 नंबर -कांदळी, ता.जुन्नर जि. पुणे), चंद्रकांत कारभारी गुंजाळ( वय 57,राहणार कांदळी, ता. जुन्नर,जि.पुणे), गीता बाबुराव गवारे (वय 45, 14 नंबर कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे),भाऊ रभाजी बढे( वय 65, रा.नगदवाडी- कांदळी, ता. जुन्नर ), नजमा अहमद हनीफ शेख (वय- 35),वशिफा वशिम इनामदार( वय 5,रा. राजगुरुनगर, ता.खेड ), मनीषा नानासाहेब पाचरणे (वय 56 वर्षे राहणार 14 नंबर, ता.जुन्नर)
अपघातातील जखमी
ऋतुजा पवार (वय 21 ),गणपत बजाबा घाडगे ( वय 52 ), शुभम संतोष घाडगे (वय 24, तिघेही राहणार कांदळी,ता. जुन्नर),नाजमीन अहमद हनीफ शेख ( राहणार राजगुरूनगर, ता. खेड), मरजीना म्हम्मद हमीद शेख (वय 15, ता.राजगुरूनगर, ता. खेड ),आयशा समीर शेख (वय 14 राजगुरूनगर, ता. खेड ).
चालक विनोद रोकडे हे मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून सोळा प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होते.पावणेदहा वाजण्याच्या सुमारास येथील मुक्ताबाई ढाब्या समोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने प्रवासी व्हॅनला मागून धडक दिली. त्यानंतर प्रवासी व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद असलेल्या एसटी बसला धडकली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या व्यक्तींनी दिली. प्रवासी वाहनाला मागून व पुढून अशा दोन्ही बाजूंनी धडक बसल्याने प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाल्याने अपघाताची तीव्रता वाढली.
घटनास्थळी सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी सहा जणांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात तर एक जणाला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. युवराज वाव्हळ हा महाविद्यालयीन तरुण नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो येथील अकादमीत अभ्यास करण्यासाठी निघाला होता. मनीषा पाचरणे या आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका असून त्या कांदळी येथून शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. दोन वर्षानंतर त्या निवृत्त होणार होत्या.त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.