कोपरगाव प्रतिनिधी
अलोकनाथ पंडोरे
लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे.
मात्र हे आंदोलन करतांना खायचे दात एक आणि दाखवयाचे दात वेगळे अशी काहींची पद्धत असते. त्यामुळे कधी कधी हे आंदोलन फसतात व तोंडघशी पडावे लागते.
असाच प्रकार माजी आमदारांनी केलेल्या खड्ड्यात बसण्याच्या आंदोलनाचा झाला आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे आंदोलन करतांना काळजी घ्यावी त्यामुळे तोंडावर पडायची वेळ येणार नाही असा खोचक सल्ला माजी नगरसेविका श्रीमती वर्षा गंगुले यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना दिला आहे.मागील पाच वर्षात लाटेवर निवडून आलेल्या माजी आमदार पाच वर्ष हवेत होत्या.
त्यामुळे त्यांचा विकास देखील फ्लेक्सवरच दिसत होता व जनतेला वेड्यात काढायचे काम बेमालूपणे सुरु होते. त्यामुळे त्रस्त जनतेने त्यांना पाचच वर्षात घरचा रस्ता दाखविला.
मात्र जनतेला पुन्हा एकदा वेड्यात काढायचा त्यांनी नुकताच केलेला अयशस्वी प्रयत्न फसल्यामुळे त्यांनी आपल्या हाताने आपले हसू करून घेतले आहे. ज्या नगर-मनमाड महामार्गाला त्यांनी गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना त्या राष्ट्रीय महामार्ग करू शकल्या नाही त्या रस्त्याला आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळवून देवून सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्यासाठी १७८ कोटी निधी मिळविला आहे. मागील पाच वर्षात या अहमदनगर-मनमाड महामार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याच्या सद्यस्थितीला जबाबदार कोण आहे हे कोपरगावच्या जनतेला चांगले माहित आहे. परंतु आपलेच पाप झाकण्यासाठी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे झालेल्या खड्यात बसून खड्डे बुजवा असे आंदोलन करतात ते पण खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरु झालेले असतांना याला काय म्हणायचे?
मात्र जनता जाणकार असल्यामुळे त्यांचे जनतेला वेड्यात काढायचे काम पूर्णपणे फसले गेले.आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा मागील पाच वर्षात फक्त फ्लेक्सवर विकास करणाऱ्या माजी आमदारांचा प्रयत्न फसल्यामुळे त्यांची होत असलेली तनफण समजू शकते. मात्र मागील पाच वर्षाच्या त्यांच्या निष्क्रियतेमुळे कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत खूप मागे गेला होता. मागील पाच वर्षात कोपरगाव तालुका दुष्काळ ग्रस्त असतांना कोपरगावच्या शेजारील तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर झाले मात्र कोपरगाव तालुक्याला माजी आमदार दुष्काळग्रस्त जाहीर करू शकल्या नाही व शेतकऱ्यांना मदत मिळवून देवू शकल्या नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडीच किलोमीटर तर काही ठिकाणी अडीच किलोमीटरच्या आत शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या माजी आमदार हातावर घडी तोंडावर बोट ठेवून गप्प होत्या. घोषणा करायच्या, फ्लेक्स लावायचे यामध्ये मागचे पाच वर्ष निघून गेले. मागील पाच वर्षाचा विकास हा फ्लेक्सवर होता आणि या अडीच वर्षातील विकास हा शाश्वत आहे. त्यामुळे त्यांचा तिळपापड होत आहे. कोरोना काळात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून हजारो बाधित रुग्णांना बरे करण्याचे काम आ. आशुतोष काळे यांनी केले हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. याउलट आपल्या नेत्यापुढे चमकोगिरी करण्यासाठी शेवटच्या दहा दिवसात शासनाचा आयता दवाखाना दाखवला त्यांच्याकडून जनतेच्या विकासाच्या अपेक्षा राहिल्याच नाहीत. त्यामुळे त्यांची सैरभैर झाली असून खड्डे बुजविण्याचे काम सुरु असतांना खड्डे बुजविण्याचे आंदोलन करून केलेली स्टंटबाजी हे वरातीमागून घोडे असल्याची टीका श्रीमती वर्षा गंगुले यांनी केली आहे.
तालुक्यातील जनतेला मागील पाच वर्षात विकासाच्या बाबतीत योगदान दिसले नाही मात्र या अडीच वर्षात नक्कीच विकास दिसत आहे. लोकप्रतिनिधींवर टीका करतांना पायाखालची वाळू कोणाच्या घसरायला लागली हे तुम्हाला चांगले माहित आहे. मात्र योगदान, प्रगती हे शब्द माजी आमदारांच्या बाबतीत तर काही लागू झाले नाही पण याचा वैयक्तिक फायदा विद्याताई तुम्हाला किती झाला हे सांगायला लावू नका. – श्रीमती वर्षा गंगुले