शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
तालुक्यातील बेलापूर येथील सिताराम उर्फ योगेश शिवदास दायमा हे लंडन येथे होणार्या शतचंडी यज्ञ या धार्मिक कार्यक्रमात पौरोहित्य करण्यासाठी लवकरच लंडन येथे जाणार आहेत.
श्री.योगेश दायमा यांना लहानपणापासून धार्मिक कार्याबरोबरच संस्कृत अध्ययनाची आवड आहे. बेलापूर येथे माध्यमिक शिक्षण सुरु असतांनाच त्यांनी स्व.प्रल्हादशास्त्री खानविलकर यांच्याकडे संस्कृत विषयात मार्गदर्शन घेतले. त्याचबरोबर वेदशास्त्र शिक्षणानंतर त्यांनी नाशिक येथील कैलास मठात श्रीकृष्ण काशिनाथशास्त्री गोडसे गुरुजी व शांतारामशास्त्री भानोसे गुरुजी यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. उज्जैन येथील सांदीपनी विद्यालय तसेच पुणे येथील वेदशास्त्रोद्येजक सभा येथील परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
गेली १८ ते २० वर्षापासून ते वैदीक कार्यासाठी देशभर भ्रमण करीत आहेत. लंडन येथे नवरोत्सव काळात होणार्या शतचंडी यज्ञासाठी त्यांना तेथील किर्तीकुमार पटेल यांच्याकडून निमंत्रीत करण्यात आले आहे. यासाठीचे पुरोहित नितेश शास्त्री यांच्याकडून त्यांनी ऑनलाईन परीक्षाही विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली आहे. बेलापूर येथील कापड व्यापारी शिवदास दायमा यांचे चिरंजीव तसेच रोहित दायमा यांचे ते बंधू आहेत. या बहुमानाबद्दल श्री.दायमा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.