अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; लोहा पोलिसात गुन्हा दाखल - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 28, 2022

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; लोहा पोलिसात गुन्हा दाखल


लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
लोहा तालुक्यातील धावरी येथील इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविल्याची घटना दि. २५ ऑगस्ट रोजी घडली. सदर प्रकरणात आरोपी तरुणाच्या माता पित्यास लोहा पोलिसांनी अटक करून दि.२६ सप्टेंबर रोजी लोहा न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
लोहा शहरापासून सहा किमी अंतरावरील धावरी येथे राहणारे शेतकरी कुटुंब दैनंदिनी प्रमाणे दि. २५ ऑगस्ट रोजी दिवसभर शेतात काबाडकष्ट करून आल्यानंतर जेवण आटोपून आपल्या दोन मुली व एका चिमुकल्या मुलासोबत रात्री नऊ वाजताच्या दरम्यान झोपले. दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता मुलीची आई  झोपेतून उठल्यानंतर आपली अकरावी वर्गात शिक्षण घेणारी सोळा वर्षीय मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास येताच तिने सदरील घटना पतीच्या कानावर टाकली. सकाळी शेजारी, गावात, नातेवाईकांकडे सर्वत्र शोधाशोध केली परंतु मुलीचा शोध लागला नाही. शेजारी राहणारा गावातीलच कृष्णा आनंदा काळे (वय २१) हा देखील गावात नसल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात गावातील कांहीं प्रमुख मंडळीच्या माध्यमातून आरोपी कृष्णाच्या आई वडिलांसोबत बोलणे केले असता त्यांनी मुलीस आणावयास सांगतो मात्र तुमच्या मुलीचे आमच्या मुलाशी लग्न लावून द्या. अशी अट घातली. परंतु मुलीचे वय लग्ना योग्य नसल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी त्यास विरोध दर्शविला. मुलगी परत घेवून येत नसल्यामुळे अखेर मुलीच्या वडिलांनी लोहा पोलिस ठाणे गाठून आरोपी कृष्णा व त्याच्या आई वडीलां विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रेखा काळे यांनी आरोपीचे आई वडील लक्ष्मीबाई व आनंदा काळे यांना ताब्यात घेवून लोहा न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रारंभी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. दि. २६ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
             याप्रकरणी तपास अधिकारी रेखा काळे यांनी आरोपीच्या संपर्कातील सर्व भ्रमणध्वनी क्रमांक, सहकारी मित्र, नातेवाईक यांचा कसून तपास करत आहेत. आरोपीच्या संपर्कात जे कुणी असतील त्यांच्यावर पोलिसात लवकरच तपासाअंती गुन्हे दाखल करू असे पो.उप.नि. रेखा काळे यांनी सांगितले.
           सदर प्रकरणी लोहा पोलिसात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविने आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.