संजय महाजन
शिर्डी शहरातील सर्वसामान्य व्यावसायिक आणि नागरिकांनी नगरपरिषदेच्या प्रस्तावित वाढीव कररचनेला लेखी हरकती घेऊन आपला आक्षेप नोंदवावा,
असे आवाहन माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की शहराची अर्थव्यवस्था साईमंदिरावर अवलंबून आहे. कोविड काळात साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी तब्बल दोन वर्षे दर्शनासाठी बंद होते.
त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पुढील दोन- तीन वर्षे हे आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता नाही.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी करमाफीबाबत ठराव केला.
शिर्डीकरांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन करून घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याची मागणी केली होती. त्याआधारे करमाफी केली जावी. सध्याच्या नगरपरिषदेला विकासकामांसाठी साईसंस्थानकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो.
या आर्थिक संकटात करमाफी देऊन नगरपरिषद प्रशासनाने सर्वांना दिलासा देणे गरजेचे आहे. याबाबत विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.
तथापि, शहरवासीयांनी लेखी हरकती नोंदविणे गरजेचे आहे. आपण विखे पाटील यांना साकडे घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत आहोत.