Railway: साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या 6 डब्यांमधून सात बॅगा लंपास!
Latest Solapur News: साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या विविध ६ डब्यांमधून प्रवास करणाऱ्या एकूण ७ रेल्वे प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत, चोरट्यांनी बॅग चोरुन नेल्या. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, साड्या असा एकूण सुमारे ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
ही घटना २८ ऑगस्टच्या मध्यरात्री ते २९ ऑगस्टच्या पहाटे पाच या दरम्यान कुडुवाडी रेल्वे स्थानकावरून गाडी पुढे गेल्यानंतर घडली. वाय नागार्जुन (रा. पी. कोंडापुरम, पामिडी अनंतपुर आंध्रप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी वाय नागर्जुन, एम. व्ही. व्ही. सत्यनारायण रेड्डी (रा. विशाखापट्टणम आंध्रप्रदेश), गोविंदराज नारायणसामी (कांचीपुरम, श्रीनिवासनगर तमिळनाडू), एनजी गंगाराम व्याप्पमपट्ट (तिरुवल्लरु, तमिळनाडू), इलुमलाई क्रिष्णापिल्लई, (रा. कांचीपुरम तमिळनाडू), शट्टी श्रीनिवासराव (रा. मोरामपुडी, गोदावरी इ. आंध्रप्रदेश), एम. शशीकला (रा. चेन्नई) हे सर्व साईनगर शिर्डी या गाडीच्या (२२६०१) एस ८ ते एस १३ या सहा विविध बोगीमधून शिर्डीला जाण्यासाठी कुटुंबासह निघाले होते.
रात्रीच्या वेळी झोपले असता, कुर्दुवाडी रेल्वे स्थानकावरून गाडी शिर्डीच्या दिशेला काही किलोमीटर अंतर गेली असता, चोरट्यांनी त्यांच्या झोपेचा फायदा घेत सामानासह बॅग चोरुन नेल्या. यामध्ये फिर्यादीच्या प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ लाख ५० हजार रुपयांच्या ३० साड्या, इतर प्रवाशांची रोख २५ हजार ७०० रुपये, कपडे, बॅग व असे सर्वांचा एकूण ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
JDM NEWS शिर्डी
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क 9011302859