पुणे शहरात तीन दिवस मुसळधार पाऊस - JDM

JDM


Breaking

Saturday, August 19, 2023

पुणे शहरात तीन दिवस मुसळधार पाऊस

पुणे प्रतीनिधी :
चेतन चव्हाण

अडखळलेला मान्सून शहरात सक्रिय झाला असून, शुक्रवारी दुपारपासून आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घाटमाथ्यासह शहरात तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात शहरात एकदाही मोठा पाऊस झालेला नाही. सुमारे अडीच महिने रिमझिम पाऊसच सुरू असून, त्या पावसाने 257 मि.मी.चा टप्पा गाठला. आता मान्सून शहरात पुन्हा सक्रिय होत आहे. हवामान विभागाने मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शहरात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख

डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगतले की, संपूर्ण पुणे जिल्ह्यात मान्सून सक्रिय होत असून, 19 ते 21 ऑगस्ट या कालावधीत शहरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आकाश ढगांनी झाकोळून आले. गार वारा सुटला तसेच काही भागांत पावसाला सुरुवात झाली होती.