दिव्यांग असल्याने क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना विमानात नाकारला प्रवेश - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 21, 2022

दिव्यांग असल्याने क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना विमानात नाकारला प्रवेश

व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सचा भेदभाव ; तिकिटाचे पैसे परत द्यायलाही नकार.

मुंबई प्रतिनिधी 
नारायण सावंत
बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी निघालेल्या भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना दिव्यांग असल्याने व्हिएटजेट इंडिया ( Vietjet India ) एअरलाइन्सने विमानात प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार  मुंबई विमानतळावर घडला आहे . या प्रकारामुळे प्रभू व्यथित झाले आहेत . बाली येथे २० ते 24 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होत असून या स्पर्धेत भारतासह जगभरातील १६ देश सहभागी होणार आहेत . अरविंद प्रभू हे माजी आमदार आणि मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे चिरंजीव आहेत . ९५ टक्के दिव्यांग असलेले अरविंद प्रभू व्हीलचेअरवर असतात . परदेशात विमानाने जायचे असेल तर त्यांच्याबरोबर अटेंडंट घेऊनच ते प्रवास करतात . पिकलबॉलच्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी रात्री बालीला रवाना झाला . अरविंद प्रभू  आणि त्यांच्या चार अटेंडंटचे खेळाडूंच्या विमानानंतर एका तासाने रात्री १.२५ चे विमान होते . त्यासाठी ते शनिवारी रात्री १० वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले . चेकिंग काउंटरवर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने प्रभू यांचा बोर्डिंग पास न देता त्यांच्यासोबत असलेल्या चार जणांचे बोर्डिंग पास दिले . लो कॉस्ट एअरलाइन्स असल्याने दिव्यांगांसाठी केबिन चेअर नसल्याचे सांगत प्रभू यांना प्रवास करता येणार नाही , असे व्हिएतनामच्या कर्मचाऱ्याने सांगितले .

*म्हणे रीतसर तक्रार करा* अरविद प्रभू यांनी या प्रवासासाठी पाच लाख रुपये खर्च केले होते . विमानात प्रवेश नाकारल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले असता रीतसर तक्रार करा त्यानंतर बघू असे सांगण्यात आले . इतर चार जणांना आम्ही प्रवास करण्यास अडवले नव्हते . त्यामुळे त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार नाहीत , असे उत्तर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने दिले .

मी मागील ३५ वर्षात अनेक देशांचा प्रवास केला आहे . दिव्यांग असल्याने मला नेहमी अटेंडंट घेऊन जावे लागतात . त्यामुळे मी लो कॉस्ट एअरलाइन्सनेच प्रवास करतो . याआधी मला कधीच विमान प्रवासापासून रोखण्यात आले नव्हते.

 *अरविंद प्रभू अध्यक्ष , भारतीय पिकलबॉल असोसिएशन*