Beed Murder Case : बीडमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड! जमावाच्या हल्ल्यामध्ये दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू - JDM

JDM


Breaking

Friday, January 17, 2025

Beed Murder Case : बीडमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड! जमावाच्या हल्ल्यामध्ये दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू


संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये जमावाच्या मारहाणीमध्ये दोन भावांची हत्या झाली.

बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

मागील महिन्यामध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला आहे. विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरले. यानंतर आता आरोपींना अटक झाली असून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावंडांचा जीव गेला आहे.

बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. बीडमधील तरुणांच्या अनेक बंदुक दाखवून दहशद निर्माण करणाऱ्या व्हिडिओ देखील समोर आल्या आहेत. यामुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरुन बीडचे माजी पालकमंत्री व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव देखील वाढवला असून राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा बीडमध्ये झालेल्या जमावाच्या हल्ल्यामध्ये दोन सख्ख्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गुरुवारी (दि.16) रात्री बीडमध्ये जमावाने हल्ला केला. यामध्ये जमावाने हल्ला केल्यामुळे दोन भावंडाचा मृत्यू झाला असून तिसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अंभोरा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये झाली आहे. यामुळे बीडमध्ये जमावाचा हल्ला आणि यामध्ये जखमी झालेल्या लोकांबाबत सहानभूती व्यक्त केली जात आहे. तर लोकांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळे सत्ताधारी नेत्यांवर आणि गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुरुवारी (दि.16) रात्री 10 वाजताच्या सुमारास, अष्टी तालुक्यातील हाटोलन गावचे रहिवासी अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, आणि कृष्णा विलास भोसले हे तिघेही वहिरा गावात आले होते. स्थानिक गावातील आणि बाहेरील काही लोक या ठिकाणी जमले होते. सायंकाळपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर रात्री उशिरा वादाला सुरुवात झाली.

वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले आणि जमावाने लाकडी दांडके व धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात अजय आणि भरत भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा भोसले गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. मात्र वादामधून झालेल्या या हल्ल्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. पोलीस तपासादरम्यान, सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अजय आणि भरत भोसले यांच्या मृतदेहांना अष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र अशा घटनांमुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याचे दिसून येत आहे.