रमेश खेमनर
राहुरी तालुक्यातील कात्रड येथे अधिक महिन्यानिमित्त आयोजित धोंडे जेवणाच्या कार्यक्रमानंतर कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूचा खून केल्यानंतर जावयाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासुरवाडीतच घरजावई म्हणून राहत होता. त्याने रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच पत्नी नूतन साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगट यांचा डोक्यात रॉडने मारून खून केला. त्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागरने एमआयडीसी परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे.
कौटुंबिक वादातून ही घटना झाली आहे. आरोपीची पत्नी माहेरी राहत होती. त्याचे तिच्यासोबत आणि सासूसोबत त्याचे वाद होते. पत्नी सासरी येत नसल्याने सागर तिच्या माहेरी येऊन राहत होता. सागर एमआयडीसीमध्ये नोकरी करीत होता. पंधरा ऑगस्टला सासूने धोंडे जेवण केले होते. रात्री उशिर झाला मात्र सागर आलाच नाही. त्यामुळे सर्व जण झोपी गेले. त्यानंतर घरी आलेल्या सागरने दोघींचा खून केला.
आपल्या लहान मुलीला त्याने नातेवाइकांच्या घरी सोडले आणि नंतर पसार झाला. नातेवाइकांना शंका आल्याने त्याने दांगट यांच्या घरी येऊन पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली. तसेच त्याने देखील आत्महत्या केली. या घटनेमुळे नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या घरी सतत वाद होत होते. यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत आता पोलिस तपास करत आहेत.