शौकतभाई शेख
मराठी भाषा आणि संस्कृती ही जगात प्रभावी आहे, या भाषेत संशोधन कार्य करणाऱ्या आणि पुणे विद्यापिठाची संशोधन मार्गदर्शक मान्यता लाभलेल्या प्रा. डॉ. योगिता रांधवणे यांचे संशोधन विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल असे मत तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. योगिता रांधवणे यांचा सत्कार करण्यात आला. रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. योगिता मारुती रांधवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एम. फिल.पीएच.डी.गाईडशीप मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना अर्जुन राऊत बोलत होते. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
एक आदर्श,अभ्यासक विद्यार्थिनी म्हणून डॉ. योगिता रांधवणे यांच्या आठवणी सांगून त्यांच्या संशोधनाचे कौतुक केले.
डॉ.रांधवणे यांनी पीएच. डी. प्रबंध आधारित 'मराठी ग्रामीण आई : स्वरूप आणि शोध 'हा ग्रंथ प्रकाशित केला, तो महत्वाचा आहे. या ग्रँथाला प्रसिद्ध समीक्षक डॉ. शिवाजी काळे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका सौ.मोहिनी काळे यांनीही डॉ. रांधवणे यांचा सत्कार केला.डॉ. शिवाजी काळे यांचा सत्कार प्रा.अभिमन्यू गायकवाड यांनी केला.
यावेळी अर्जुन राऊत यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, टाकळीभानला नोव्हेंबर महिन्यात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे, त्यावेळी डॉ. योगिता रांधवणे यांचे संशोधन मार्गदर्शन लाभणार आहे.त्यांचे पुस्तकसंशोधन उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. योगिता रांधवणे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या पुस्तकाचे आणि संशोधन कार्याची माहिती दिली.गुरुवर्य, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आत्मीयतेने, निरपेक्षपणे मार्गदर्शन केले.
त्याबद्दल डॉ.उपाध्ये, सौ.मंदाकिनी उपाध्ये यांचा सत्कार केला.यावेळी दिगंबर मगर उपस्थित होते. अभिमन्यू गायकवाड यांनी आभार मानले.